*विभाजक*
मी शांत झुळूक
तर तू झंझावात,
तरीही झालीच ना
आपल्या नात्याची रुजवात...
मी थोडीशी संयमी
तू उतावीळ जरासा,
तरीही क्षणोक्षणी वाटायचा
सहवास तुझा हवाहवासा...
मी चौकटीत जगणारी
तू स्वच्छंदी बागडणारा,
तरीही अखंड चाले संवाद
तासनतास सुखावणारा...
मी खूपच बोलणारी
तू मितभाषी कमालीचा,
तरीही शब्द स्फुरण्याआधी
बऱ्याचदा तू जाणायचा...
स्वभावाने भिन्न दोघे
तरी गढून गेलो प्रेमात
कुठलाच ना विभाजक
कधीही आला नात्यात...
जपत आलो आपण मने
नेहमीच रे एकमेकांची
म्हणूनच अजूनही शाबूत
दोर तुझ्या माझ्या नात्याची....
दोर तुझ्या माझ्या नात्याची....
*सौ छाया जावळे*
*वाई,सातारा*
*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*